झर झर झरता धारा
खुलून आली धरती
खाली दाट हिरवळ
मेघांची दाटी वरती
फुलला मोर पिसारा
खुलला इंद्रधनु वरती
साज हिरवा गंध मरवा
नटली थटली धरती
खेळ ऊन पावसाचा
क्रिडा विहंग करती
तरूवरी बघून सुमने
तनमने उधाण भरती
पसरता दरवळ मातीचा
मतीचे भान हरपती
वाहत परिमळ तो निर्मळ
झुळूके झुळझुळ वाहती
तुडुंब भरले पाणवठे
डरांव मेंढक करती
वसुंधरे वर ओल्या हरित
गाई गुरे चरती
प्रसन्नतेने ठाण मांडले
नैराश्य बाधा हरती
शिडकावे शुभ शकुनाचे
प्राण सृष्टीत भरती
फुटला बांध सणांचा
राउळ॓ भक्तांनी भरती
कुणी सोडती संकल्प
उपवास कुणी धरती
घेऊन कावड भगत
भजन भैरवाचे भजती
ताशेढोल गाज धडाडा
शंखनाद हुंकार गर्जती
आतुरतेनी वाट श्रावणाची
बघता मने झुरती
कळेचिना दिन चैतन्याचे
नकळत कधी सरती
कालचक्र ते फिरत रहाते
पुण्यवंत ते तरती
आयुष्याचा श्रावण सरतो
आठवणी त्या उरती
अमुल्य आहे काळवेळ
अतुल्य आहे धरती
अलभ्य आहे जन्म मानवी
मानवता हीच आरती!
*****
~ राजीव नि. देशपांडे
This poem has not been translated into any other language yet.
I would like to translate this poem