आहे हे असे आहे - २ (ग्रामीण) Poem by Rajeev Deshpande

आहे हे असे आहे - २ (ग्रामीण)

बोल कुणाला लागत नाही
हा काळाचा कोप आहे
सृष्टीचा समतोल बिघडला
म्हणून निसर्गाचा चोप आहे

महानगरांची ही अवस्था
याहून बिकट खेड्यांची आहे
सगळे डोके धरून बसले
जग जत्रा वेड्यांची आहे

दुर्दैवाचे भोग सरत नाहीत
चोहीकडून दाटले आहे
कोठे कोठे ठीगळ लावता
सगळे आभाळच फाटले आहे

अस्मानी सुल्तानी कस लावते
कसे बसे तगत आहेत
देवावर भाबडी श्रद्धा ठेवत
एकेक दिवस जगत आहेत

दुबार पेरणी देखिल उलटली
माय दवाखान्यात भरती आहे
लेकीचे लगीन येऊन ठाकले
भूमीपुत्राची नजर वरती आहे

भाऊबंदकी भाळी लिहीलेली
पिऊन हालत खालावत आहे
जमीनीचा हिस्सा मागण्यासाठी
चुलता वाद घालत आहे

कर्जातून सावरत उभा राहतो
कष्टाने घाम पेरत आहे
पुन्हा नाउमेद करण्याची संधी
लहरी निसर्ग हेरत आहे

दिवस रात्र एक करत
किडूक मिडूक जोडत आहे
संसाराचा गाडा हाकता हाकता
उभयताचे कंबरडे मोडत आहे

शेवटचा दागिना गहाण टाकला
जमीन पायाखाली सरकत आहे
असे कीती आले नी गेले
सावकाराचे घरी बरकत आहे

एकच 'एस् टी' गावात यायची
तीही बंद पडली आहे
टेम्पो सगळे शहरात गेले
माहेरवाशीण अडली आहे

घंटा घंटा फाट्यावर उभा
वाहनाची वाट पाहत आहे
तहानेने घसा कोरडा पडला
घामाच्या धारा वाहत आहेत

दिवस सगळा तहसिलीत गेला
बाबू त्रुटी काढतच आहे
कागद काही भेटत नाही
व्याजाचा हप्ता वाढतच आहे

बारा घंटे वीज नाही
कर्जातून पंप लावले आहेत
आडातले पाणी आटत चालले
गडी सगळे कावले आहेत

उजाड वावरात टांगून राहीले
छातीत धडकी भरत आहे
काही खरं नाही गावाचं म्हणत
शहराची वाट धरत आहेत

शेती विकून शहरात दाखल
आशेने दुकान थाटले आहे
उद् घाटन दिनीचे लोंढे पुढे
गि-हाईक म्हणून आटले आहेत

पारावर गप्पा रंगात आल्या
जुने उकरून काढत आहेत
विकासाचे धोरण एकही नाही
जातीय तेढ वाढत आहे

राजकारणाशिवाय विषय नाही
सामाजिक भान हरपत आहे
संवेदना लोप पावत चालली
समाज मन करपत आहे

पिढ्यान पिढ्या हेच चालू
तरी आशा जागत आहे
काळ रात्र सरता सरता
पहाटेची आस लागत आहे

भूईत पाय घट्ट रोवले
मातीने मळवट भरले आहे
रयतेच्या रगे पुढे पीडेचे
दशावतार हरले आहेत

हेही दिवस जातील राजा
भाग्याचे पेव फुटत आहेत
तुझ्याच पोटीचे अंकूर आता
नव्या जोमाने उठत आहेत

संताची होता कृपा कोरड्या
आडात पाणी खळखळले आहे
काळ्या आईशी इमान राखता
नव्याचे नशिब फळफळले आहे!
~ राजीव नि. देशपांडे

POET'S NOTES ABOUT THE POEM
This is a realistic poem about rural life today.
READ THIS POEM IN OTHER LANGUAGES
Close
Error Success