आहे हे असे आहे - १ (शहर) Poem by Rajeev Deshpande

आहे हे असे आहे - १ (शहर)

सभोवताल नित्य बदलत आहे
जीवन दिशाहीन वाहत आहे
मुकसाक्षी होऊन जो तो
उद्याची वाट पाहत आहे

महानगरे तुडुंब भरली
यंत्रणा अपूरी पडत आहे
जीवघेण्या स्पर्धेत जो तो
अस्तित्वासाठी लढत आहे

झाडे उरली ओषधापुरती
इमारती जोमाने उठत आहेत
सांडपाणी तुंबले नाल्यांमध्ये
जागोजागी पाईप फुटत आहेत

घाणीचे साम्राज्य फोफावले
रोगराई गळे घोटत आहे
औषध काढे घेत लोक
आला दिवस लोटत आहे

शहर सोडून उडाले पक्षी
डास माश्या अनावर आहेत
गजबजलेल्या गल्ली बोळात
कुत्री डुकरांचा वावर आहे

पाणीपुरवठा घटला निम्मा
पाणीपट्टी दुप्पट आहे
सार्वजनिक नळ निघाले निकाली
घरोघरी हापश्या आटत आहेत

वीजपुरवठा झाला अनियमीत
पंखे दिवे मंद आहेत
पोस्टमन येतात बिलापुरते
अर्धे दूरध्वनी बंद आहेत

रेल्वेगाड्या रोजच उशीरा
वेळ घालवण्याचा सराव आहे
स्थानकातून बाहेर पडताच
रिक्षावाल्यांचा घेराव आहे

उन्हातान्हात काम करत
मजुरांचे रक्त आटत आहे
जागोजागी फलक लावत
पुढारी श्रेय लाटत आहेत

तोंडं काळवंडतात गरीबांची
हातावर ज्यांचे पोट आहे
चेहरे झाकतात सुखवस्तु कारण
हवेत धुळीचे लोट आहेत

महागाई भिडली आकाशाला
सामान्यांचे जीणे बिकट आहे
घोटभर चहा झाला महाग
रस्त्यांवर महाप्रसाद फुकट आहे

रहदारीची अवघी वाट लागली
मुजोरी अरेरावीचा सूर आहे
जनावरे रस्त्याच्या मधोमध उभी
वाहनांमागून काळा धूर आहे

फुटपाथ वर जागा नाही
मार्गांवर वाहनांची रीघ आहे
खड्डे चुकवून बाजुला जाताच
कडेला गिट्टीरेती चे ढीग आहेत

चौंकांचे सुशोभिकरण झाले
रस्त्यांवर खड्डे कायम आहेत
ट्रॅफीक सिग्नल बंद असावेत
असा अलिखित नियम आहे

शाळकरी बाळ्या बाईक चालवितो
आई कौतुकाने पाहत आहे
आजीला नातवाची काळजी
बाप पेट्रोलची चिंता वाहत आहे

प्रथमच घोड्यावर बसला नवरदेव
मित्र त्याला चिडवीत आहेत
सूर्यालाही लाजवेल अशा प्रकाशात
बॅंडवाले बेफाम बडवित आहेत

वरात ढेपाळली चौकांमध्ये
साठी उलटलेले नाचत आहेत
फटाक्यांच्या धुराने गुदमरले वराती
चहूबाजूंनी वाहने साचत आहेत

जीवनात प्रसंग कसेही येवोत
स्वाभिमान सर्वांना अवगत आहे
गळपट्टा घालून का होईना
लोक ताठ मानेने जगत आहेत

प्रत्येक गोष्ट सरकारवर ढकलत
नागरिक कर्तव्य विसरत आहेत
सल्ले द्यायला सदैव तत्पर
सहकार्य करायला कचरत आहेत

बदल निसर्ग नियम खरा
पूर्वापर गिरवलेला कित्ता आहे
पुरूषार्थ तेवढा कायम राहतो
दृश्यावर काळाची सत्ता आहे

कल्पनेच्या भरा-या पडतात थिट्या
नियतीच्या हाती दोर आहे
कितीही करा उठापटक
काळ शेवटी शिरजोर आहे!
*****
~ राजीव निळकंठ देशपांडे

POET'S NOTES ABOUT THE POEM
This is a realistic poem describing life today.
READ THIS POEM IN OTHER LANGUAGES
Close
Error Success