।। प्रतिक्षा ।। Poem by Rajeev Deshpande

।। प्रतिक्षा ।।

गडगडणारे गडद काळे मेघ दाटती आकाशी|
लखलखणारी दामिनी आडूनी आसमंत प्रकाशी||

भेगाळलेली अवनी खाली तहानलेली अधाशी|
समस्त जीवांचे आतुर लोचन बघती आकाशी||

झाली वसुंधरा ढेकुळांचा विस्तिर्ण प्रदेश जशी|
शिडकाव्यांनी भिजता देते गर्द हिरवळ पायाशी||

सुखसमृद्धी दुथडी वाहते बरसता पर्जन्य देशी|
दरवळे गंध कस्तुरी मातीचा माती बावनकशी||

कोसळो पर्जन्यधारा भरभरोनी त्या अमृतराशी|
तृप्त होवो हरेक जीवजंतू कोणी न राहो उपाशी||

आशाळभूत देशवासी प्रार्थना करिती देवापाशी|
भारतभूमीची अर्थ व्यवस्था निगडीत पावसाशी||

पावसाळे येतील जातील जमतील ढग आकाशी|
असो दृश्य ते नाशवंत प्रतिभा शाश्वत अविनाशी||

~ राजीव नि. देशपांडे

Friday, May 15, 2015
Topic(s) of this poem: rainy season
COMMENTS OF THE POEM
READ THIS POEM IN OTHER LANGUAGES
Close
Error Success